महाराष्ट्रात आजपासून 4-5 दिवस पावसाची शक्यता

0

मुंबई,दि.23: पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, आजपासून राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसाठी यलो अलर्ट

25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्याला 24 ते 26 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने अंदाज वर्तवला

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पाडणारा पूर्वेकडील कुंड पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. लवकरच केरळ आणि लगतच्या भागात पोहोचेल. दरम्यान, मुंबईत 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, २४ नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस पडू शकतो, 27 नोव्हेंबर रोजी पावसात घट होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here