भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे CCTV फुटेज आले समोर

0

मुंबई,दि.3: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे CCTV फुटेज समोर आले आहे. उल्हासनगरमध्ये शुक्रवारी (दि.2) रात्री उशिरा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. हिल लाईन पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये हा गोळीबार झाला, जिथे दोन राजकारणी आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी आमदाराला ताब्यात घेऊन अटक केली.

मला या कृत्याचा कसलाही पश्चाताप नसल्याचं सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे.

या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज आता माध्यमांसमोर आले आहेत. गायकवाड यांनी केबिनमध्ये प्रवेश घेत बेछूट गोळीबार केला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गणपत गायकवाड हे त्यांच्याकडील पिस्तुलातून बेछूट गोळीबार करताना दिसत आहे. या गोळीबारातून महेश गायकवाड, राहुल पाटील यांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्यात राहुल पाटील यांच्या हाताला, खांद्याला गोळी लागली. मात्र गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. यावेळी लपण्यासाठी महेश गायकवाड यांनी केबिनच्या दरवाजाचा वापर केला. परंतु गायकवाड यांनी हातातील बंदुकीसह गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला. या झटापटीत बाहेरील जमाव आणि पोलीस केबिनमध्ये शिरले. त्यानंतर दोन्ही गटात केबिनमध्येच हाणामारी झाली. या गोंधळात पोलिसांनी धाडसाने आमदार गणपत गायकवाड यांना रोखून तात्काळ ताब्यात घेतले. तर महेश गायकवाड, राहुल पाटील या दोन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here