सोलापूर,दि.१६: ATM मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा सगळीकडे आहे. अनेकजण रोख रक्कम काढण्यासाठी एटीमचा वापर करतात. मात्र दुर्गम भागात असलेल्या लोकांना एटीएम मशीन सुविधा मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. एटीएम कार्डचा वापर करून एटीएम मशीनमधून पैसे काढणे हे सर्वांना माहित आहे. मात्र आता मोबाईल फोनद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
लवकरच गुगल पे, फोन पेसारख्या यूपीआयचा वापर करून कॅश काढता येणार आहे. सध्या यूपीआयवरून पैसे पाठवणे, बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग करणे सोपे आहे. आता लवकरच कॅश काढणेही शक्य होईल, असा दावा केला जातोय. स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढणे आता आणखी सोपे होणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दिशेने मोठी तयारी करत आहे. एका अहवालानुसार, लवकरच देशभरातील २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉंडंट आउटलेट्सवर युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पैसे काढता येणार आहेत. यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) मंजुरी मागितली आहे.
अनेक जण बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करतात. बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे असे स्थानिक प्रतिनिधी जे दुर्गम भागांमध्ये बँकिंग सेवा पुरवतात. एनजीओ, स्वयंसहायता गट, मायक्रो फायनान्स संस्था किंवा इतर नागरी संस्था यांसारख्या संस्था बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. त्यांच्याकडे क्यूआर कोड असेल. आपल्या यूपीआयवरून हे क्यूआर कोड स्कॅन करायचे. त्यानंतर बँक करस्पॉन्डंट तुम्हाला कॅश देईल. तुमच्या खात्यातून पैसे कट होतील. ते बँक करस्पॉन्डंटच्या खात्यात जातील.
सध्या यूपीआयवरून कार्डचा वापर न करता पैसे काढण्याची सुविधा यूपीआय एनेबेल एटीएमवर उपलब्ध आहे. काही दुकानदार ही सुविधा देतात. त्या ठिकाणी फक्त एक हजार रुपये किंवा दोन हजार रुपये काढू शकतो. ही सुविधा आता देशभरातील 20 लाखांपेक्षा जास्त बँक करस्पॉन्डंटपर्यंत पोहोचवायचा सरकारचा प्रयत्न आहे.








