बीड,दि.30: भाजपा आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांच्यावर जमीन जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमिनीचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.
सुरेश धस यांच्या भाऊ, पत्नीवरही गुन्हा दाखल
बीडच्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमीन घोटाळाप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्यासोबतच त्यांची पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखी आणि अस्लम पठाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखी आणि अस्लम पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानं आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) I p c 465, 468, 471, 120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, चिंचपूर आदी देवस्थानांचे हे कथित जमीन घोटाळा प्रकरण आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जमीनी हडपण्याचे प्रकार सुरु आहेत, असे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी 2021 मध्ये निदर्शनास आणून दिले होते.
एसआयटीकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एसआयटीने अहवाल दिल्यानंतरही फौजदार कारवाई न झाल्याने हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुरेश धस यांच्याविरोधात निकाल दिला होता.
आधी फौजदारी गुन्हे दाखल करा आणि नंतर तपास करा, असे आदेश खंडपीठाने दिले होते. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर खंडपीठाने निर्णय दिला होता.
पोलीस आणि एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरा, असेही खंडपीठाने म्हटले आहे. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मात्र काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आता कोर्टाच्या आदेशानुसार, धस यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.