मुंबई,दि.17: निवडणूक काळात अनेक राजकीय पक्षांकडून विविध आश्वासने दिली जातात. मोफत योजना जाहीर केली जाते. मोफत वीज, मोफत पाणी, मोफत लॅपटॉप वगैरे. पण मुख्यमंत्र्यांच्या भविष्यातील निवडणुकीच्या आश्वासनांमध्ये ‘मोफत पत्नी’चा समावेश असू शकतो असे वादग्रस्त वक्तव्य ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच एआयएडीएमके पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार सी.व्ही. षण्मुगम (C. V. Shanmugam) यांनी केले आहे.
पक्षाच्या बूथ कमिटीच्या बैठकीत बोलताना षण्मुगम म्हणाले की, स्टॅलिन सरकारला मोफत वस्तू वाटण्याचा इतिहास आहे. रेवडी कल्चर म्हणजेच मोफत वस्तू वाटपाच्या भूमिकेवर टीका करता सी.व्ही. ई. षण्मुगम यांनी महिलांची तुलना निवडणुकीत मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तूंशी केली आहे. या धक्कादायक टिप्पणीनंतर तामिळनाडूमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे.
निवडणुका जवळ येत असल्याने ते (स्टालिन) आता लॅपटॉप, मिनीबस, मिक्सर आणि ग्राइंडर व्यतिरिक्त मोफत पत्नी वाटू शकतात. सत्ताधारी द्रमुकने या टिप्पणीचा तीव्र निषेध केला आणि षणमुगमवर महिलांचे अश्लील चित्रण केल्याचा आरोप केला.
एआयएडीएमके बूथ कमिटी प्रशिक्षण सत्रात बोलताना, षण्मुगम यांनी, “भविष्यातील निवडणुकीच्या आश्वासनांमध्ये ‘मोफत पत्नी’ आणि मिक्सर आणि गायी यासारख्या वस्तूंचा समावेश असू शकतो,” असं विधान केलं. त्यांनी असा दावा केला की अशा ऑफर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याकडून दिल्या जाऊ शकतात. सी.व्ही.ई. षण्मुगम यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘करुणानिधींचा मुलगा’ असा केला.








