मुंबई,दि.30: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरातून सीडी आणि पेन ड्राइव्ह गायब झाले आहे. या सीडी आणि पेन ड्राइव्हमध्ये भाजपा नेत्यांचे कारनामे होते. भाजपाच्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांचा गौप्यस्फोट करणारी सीडी आणि पेन ड्राइव्ह आमदार एकनाथ खडसे यांच्या घरातून गायब झाले आहे. बरोबरच महत्त्वाची कागदपत्रेही कुणी लंपास केली आहेत. घरातील दागदागिन्यांबरोबर या वस्तूही चोरीला गेल्यामुळे संशय आणखीनच बळावला आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपा नेत्यांचे कारनामे आणि भ्रष्टाचार यांचे पुरावे असलेली सीडी आणि पेन ड्राइव्ह आपल्याकडे असल्याचे विधानसभेबरोबरच अनेकदा जाहिररीत्या सांगितले होते. जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये खडसे यांच्या बंगल्यात 27 ऑक्टोबर रोजी चोरी झाली. चोरटय़ांनी बंगल्याचे कुलूप तोडण्यापूर्वी बंगल्याच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. घरातील सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजारांची रोकड चोरटय़ांनी लंपास केली.

घरातील मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता, पण त्याबरोबर चोरटय़ांनी सीडी, पेनड्राईव्ह आणि भ्रष्टाचारासंबंधी माहिती अधिकारात मिळवलेली कागदपत्रेही पळवल्याचे खडसे यांच्या निदर्शनास आले. त्यासंदर्भात त्यांनी आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कागदपत्रे आणि सीडी चोरून नेण्यामागे चोरटय़ांचा काय उद्देश होता याचादेखील तपास पोलिसांनी करायला हवा, असे खडसे म्हणाले. खडसे यांच्या या माहितीनंतर त्या सीडीमध्ये नक्की काय होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.








