मुंबई,दि.14: भारतीय रेल्वेच्या मते, मुंबई ते अहमदाबाद अशी पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होऊ शकते. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर असेल. याशिवाय सरकार दिल्ली ते वाराणसी बुलेट ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. बुलेट ट्रेन धावल्यानंतर 852 किलोमीटरचे हे अंतर सुमारे अडीच तासात पूर्ण होणार आहे. सध्या दिल्लीहून वाराणसीला पोहोचण्यासाठी 12 तास लागतात.
दिल्ली ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा देशातील तिसरा मार्ग तयार करण्याची तयारी सुरू आहे. या दोन शहरांमधील अंतर सुमारे 971 किलोमीटर आहे, जे पूर्ण करण्यासाठी सध्या 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, परंतु बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर, हे अंतर केवळ 3 तासांमध्ये कापले जाऊ शकते.
दिल्ली ते अमृतसर दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याची योजनाही सरकारने आखली आहे. या दोन शहरांमधील अंतर 466 किलोमीटर असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे 7 तासांचा कालावधी लागतो, मात्र बुलेट ट्रेन आल्यानंतर हे अंतर अवघ्या दीड तासात गाठता येणार आहे. देशातील ही चौथी बुलेट ट्रेन असेल.
भारतीय रेल्वेनेही मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी केली आहे. या दोन शहरांमधील अंतर सुमारे 770 किलोमीटर आहे आणि सध्या ते पूर्ण करण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या २.२५ तासांत पार करता येणार आहे.
मुंबईला आणखी एक बुलेट ट्रेनची भेट मिळणार असून, ही ट्रेन पुण्यामार्गे हैदराबादला जाणार आहे. मुंबई ते हैदराबाद हे अंतर सुमारे 700 किलोमीटर आहे, जे पूर्ण करण्यासाठी सुमारे 13 तास लागतात. बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर हे अंतर अवघ्या 2.10 तासांत पार करता येईल. हा देशातील 6 वा बुलेट ट्रेन प्रकल्प असेल.
देशातील 7वी बुलेट ट्रेन चेन्नई ते म्हैसूर मार्गे बेंगळुरूला जाणार आहे. भारतीय रेल्वेने या मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी सुरू केली आहे. चेन्नई आणि म्हैसूरमधील अंतर 481 किलोमीटर आहे, जे पार करण्यासाठी सुमारे 9 तास लागतात. पण, बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर हे अंतर अवघ्या 1.30 तासांत पार करता येईल.