दि.20: ब्रिटनने Facebook ला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. माहितीचे उल्लंघन (Information Breach) केल्याप्रकरणी प्रकरणात ब्रिटनने मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या फेसबुकला हा दंड आकारल्याचे सांगितले जात आहे.
ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 500 कोटी रुपयांहून अधिक (5 कोटी डॉलर पेक्षा जास्त) दंड ठोठावला आहे.
जीआयएफ (GIF) प्लॅटफॉर्म जिफी (Giphy) खरेदी केल्यानंतर तपासादरम्यान नियामकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकवर हा दंड लावण्यात आला आहे. कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने (CMA) सांगितले की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे हा दंड लावणे आवश्यक झाले आहे. तसेच, कोणतीही कंपनी कायद्या पेक्षा मोठी असू शकत नाही, असे कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने म्हटले आहे. याशिवाय, फेसबुक जिफीच्या अधिग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरले आहे. याखेरीज, फेसबुक तपासादरम्यान जिफीला आपल्या प्लॅटफॉर्मसह ऑपरेट करण्यात देखील अपयशी ठरले आहे, असे नियामकाने म्हटले आहे.
The UK fines Facebook over £50 million for information breach, reports AFP pic.twitter.com/gK4anUQFhK
— ANI (@ANI) October 20, 2021
नियामकाने म्हटले आहे की, फेसबुकने जिफीच्या अधिग्रहणाबद्दल आवश्यक माहिती दिली नाही. यासंदर्भात फेसबुकला नियामकाने अनेक वेळा इशाराही दिला होता. दरम्यान, रिपोर्टनुसार, फेसबुक आपल्या रि-ब्रँडिंगची तयारी करत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. फेसबुक अॅप व्यतिरिक्त, कंपनी इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ऑकुलससाठी (Oculus) नवीन नावे देखील जाहीर करू शकते. मात्र, फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.