मुंबई,दि.27: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने अजित पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बुधवारी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना सुनील तटकरे यांनी त्यांचा पक्ष ‘खरा’ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे सांगितले होते.
लोकसभेतील आपल्या भाषणात तटकरे म्हणाले की, मी ओम बिर्ला यांचे ‘खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या वतीने अभिनंदन करतो’. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी तटकरेंच्या टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ‘केवळ दावे करून कोणी खरा होत नाही’ असे म्हटले आहे.
‘ब्रँड इज ऑलवेज ब्रँड’
लोकसभेच्या दोन जागांवर पक्षाच्या विजयाचा उल्लेख करताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष म्हणाला, ‘ब्रँड नेहमीच ब्रँड असतो. बऱ्याच जणांना ब्रँड कॉपी करायचा असतो, पण खरा कोणता ब्रँड आहे हे बारामती आणि शिरूरच्या लोकांनी दाखवून दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनीही दावा केला आहे की जर त्यांचा उमेदवार रायगडमधून लढला असता, तर तटकरे तेथून विजयी झाले नसते आणि त्यांनी ‘मागील दाराने’ (राज्यसभेत) संसदेत प्रवेश केला असता.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची भीती
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची भीती आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या काही लोकांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता. नुकतेच शरद पवार यांनी यावर मौन सोडले होते.
ते म्हणाले, ‘जे नेते पक्षाला मदत करतील आणि पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, त्यांचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र ज्या लोकांनी पक्षात राहून पक्षाचे फायदे घेतल्यानंतर पक्षाचे नुकसान करण्यासाठी पावले उचलली, त्या लोकांबाबत पक्षश्रेष्ठींचे मत घेतले जाईल.’