सोलापूर,दि.29: Boramani Airport: दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याने हालचालींना वेग येत असून या परिसरात असलेल्या माळढोकच्या अस्तित्वाचे फेरसर्वेक्षण देहरादून (Dehradun) येथील राष्ट्रीय सर्वेक्षण खात्याकडून नगरपालिका निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सध्या होटगी रोडवरील विमानतळावरुन प्रवासी विमानसेवा सुरु केली आहे. मात्र, याठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने दीर्घकालीन प्रवासी विमानसेवेत अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाकडून आता बोरामणी येथील नियोजित विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
या विमानतळासाठी 2005 मध्येच सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. मात्र, जमिनीचे संपादन झाल्यानंतर येथील नियोजित विमानतळाच्या रनवेवरच माढळोकचे अस्तित्व क्षेत्र असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. त्यामुळे येथील विमानतळाचा प्रश्न रखडला होता.
बोरामणी परिसरात कधीही माढळोक दिसला नाही, अशी माहिती येथील स्थानिकांकडून सातत्याने मिळत आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडून आता पुन्हा एकदा येथील माढळोकच्या अस्तित्वाचे फेरसर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देहरादून येथील सर्वेक्षण विभागास दिलेल्या पत्रानुसार या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. बोरामणी येथे माढळोकच्या अस्तित्वाचे फेरसर्वेक्षण करण्यासाठी पथक तयार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, प्रशासकीय यंत्रणा सध्या निवडणूक कामात व्यस्त असल्याने निवडणुका संपल्यानंतर येथील फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे.








