सोलापुरात शुक्रवारपासून दोन दिवस ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रंथोत्सव: पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे होणार उद्घाटन

0

सोलापूर,दि.१०: ग्रंथोत्सव: येथील जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य आणि वाड्.मय विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी ग्रंथ विक्री करता यावी याच उद्देशाने सोलापूर जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने शुक्रवार आणि शनिवारी या दोन दिवसात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली.

हेही वाचा Solapur News: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू

दोन दिवस ग्रंथोत्सवाचे आयोजन | ग्रंथोत्सव

हा ग्रंथोत्सव दोन दिवसाच्या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज, सांस्कृतिक भवन, (रंगभवन) सोलापूर येथे होणार आहे. ग्रंथोत्सव कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून ही दिंडी शुक्रवार दि.१३ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता. संगमेश्वर महाविदयालय ते रंगभवन कार्यक्रम स्थळा पर्यत निघणार आहे. ग्रंथदिंडीचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले-तेली या असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती | ग्रंथोत्सव सोलापूर

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. रणधीर शिंदे राहतील. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सोलापूर- माढा-धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि सोलापूर जिल्हातील विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य व जिल्हयातील प्रशासकीय अधिका-यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे.

सायंकाळी ,६ – ३० वाजता “आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षो निमित्त” गीत प्रबोधनाचा कार्यक्रम अनिल लोंढे सरकोलिकर सप्तरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने सादर करणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यीक राजेंद्र भोसले राहणार आहेत. शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता “रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज” या विषयावर कुर्डूवाडीचे ज्येष्ठ साहित्य डॉ.राजेंद्र दास यांचे मार्गदर्शन लाभणार असून अध्यक्ष म्हणून माणदेश सांगोला येथील ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले राहणार आहेत. दुपारी १२ वाजता स्पर्धेच्या युगात झेपावणा-या तरुणांई साठी चालू घडामोडी आणि नविन अभ्यासक्रम या विषयावर युनिक ॲकॅडमी पुणेचे संचालक देवा जाधवर यांचे मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजयसिंह पवार असतील. ग्रंथेात्सवा दरम्यान दुपारी २ वाजता निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार असून सोलापूरचे जेष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवी संमेलनात. यावेळी कवी इंद्रजित घुले, (मंगळवेढा), डॉ.स्मिता पाटील (मोहोळ), प्रकाश गव्हाणे (बार्शी), गणेश गायकवाड (पंढरपूर), महादेव कांबळे (सांगोला), लक्ष्मण हेबांडे (मंगळवेढा), कवी.मारुती कटकधोंड, बदीउजम्मा बिराजदार, रेणुका बुधाराम हे सोलापूरचे कवी सहभागी होणार आहेत. तर शनिवारी ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी ४ वाजता “लोकाभिमुख ग्रंथालये काळाची गरज” आणि “ग्रंथालयांची भुमिका” या विषयावर प्रा.डॉ सुवर्णा गुंड मार्गदर्शनाने होणार आहे. याप्रसंगी प्राचार्य हरिदास रणदिवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झालेल्या जिल्हा ग्रंथोत्सव समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुलभा वठारे, जिल्हा माहिती अधिकारी, संप्रदा बीडकर, जिल्हा मराठी भाषा समिती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सहायक कुलसचिव शिवाजी शिंदे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, रोटरी क्लब, उत्तर सोलापूर संचालक सुनील दावडा, जिल्हा ग्रंथपाल संघ उपाध्यक्ष महम्मद जाफर उमरअली बांगी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे श्रीकांत येळेगावकर ग्रंथालय कार्यकर्ते ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, नंदादिप प्रकाशनचे रमाकांत बोद्दुल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सदर दोन दिवसीय कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून साहित्य अकादमी, शासकीय प्रकाशने, बालभारती, शब्दशिवार प्रकाशने, नंदादिप प्रकाशन, सुविद्या प्रकाशन, नाथ प्रकाशन सातारा, अरविंद बुक डेपो, पुणे, युनिक प्रकाशन पुणे अशा विविध प्रकाशनांची ग्रंथदालने उपलब्ध होणार असून सोलापूर जिल्हयातील ग्रंथ व वाचक प्रेमींनी या ग्रंथ महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here