भाजपाचे किरीट सोमय्या यांची मोठी घोषणा, राज्यातील ४० जणांचे घोटाळे काढणार बाहेर

0

मुंबई,दि.४: भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज एका दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील ४० जणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले. सोमय्या यांनी राज्याला १ जानेवारीपर्यंत भ्रष्टाचार मुक्त करण्याची घोषणा करतानाच दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र १ जानेवारीला असणार आहे, असे सूचक वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांचे ३१ डिसेंबरपर्यंत करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. याचाच अर्थ भारत १ जानेवारी रोजी कोविडमुक्त होणार आहे, असे सांगतानाच आता ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० चोरांचे घोटाळे बाहेर काढून १ जानेवारीला महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार. आज दिवाळी आहे, मात्र पाडवा १ जानेवारीला असेल, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

परब शुद्धीत नव्हते

ज्या वेळी ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी केली, त्यावेळी ते शुद्धीत नव्हते, असे म्हणत अनिल परब यांनी ईडीला काय कबुली दिली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहे का?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

४० चोरांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगताना सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सिंग यांच्यावर १७ प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. मग त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात काय लिहिले आहे हे गांभिर्याने कशाला घेता?, असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचे सोमय्या यांनी पुन्हा एकदा सांगितले. अजित पवार यांची ही संपत्ती बेनामी असून त्यांचे नाव नसले तरी सर्व संपत्ती त्यांचीच आहे, असे सोमय्या म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here