शरद पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत: केशव उपाध्ये

0

मुंबई,दि.४: भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhyay) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली. जाहीर सभेत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज ठाकरेंनी शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका केली जात असून ‘रंग बदलणारा सरडा’ असं म्हटलं जात आहे. यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhyay) यांनी राज ठाकरेंचा उल्लेख न करता यावरुन राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे.

केशव उपाध्ये यांनी रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे पण शरद पवार याचं काय? पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? अशी विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी ट्विट करत शरद पवारांच्या राजकीय जीवनातील प्रवासातील काही घडामोडींचा उल्लेख केला आहे.

“रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण शरद पवार यांच काय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली,” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

“२०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले,” याची आठवण केशव उपाध्ये यांनी करुन दिली. तसंच अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख केला.

“बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपासोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?,” अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here