मुंबई,दि.30: काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अर्चना या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून आहेत. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या, “हा निर्णय घेताना त्याचा विचार करा असं आम्हाला साहेबांनी शिकवलं आहे, हा राजकीय प्रवासाचा वैयक्तीक निर्णय आहे. राजकीय प्रवासात पहिल्यांदाच मी सुरुवात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम आम्ही बघत होतो. त्यांचा प्रवास विलक्षण आहे. सप्टेंबर महिन्यात तयार झालेल्या संसंदेत पहिला निर्णय महिलांचा झाला. तो निर्णय ऐतिहासिक होता. या निर्णयामुळे महिलांना काम करायला संधी मिळणार आहे.”
निवडणूक काळात भाजप अधिक मजबुतीने उभा राहताना दिसत आहे. अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने भाजप लातूरमध्ये बळकट झाली आहे. काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील आणि उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधील एक मोठं कुटुंब आणि मराठवाड्यातील मोठ्या नेत्याची सून भाजपमध्ये आल्याने मराठवाड्यात भाजप अधिक बळकट होण्यास मजबूत होणार आहे.