भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तुफान दगडफेक

0

अहमदाबाद,दि.4: विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केली. गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, भाजपच्या या गुंडगिरीवर राहुल गांधींनी थेट भाष्य केले आहे. भ्याड आणि हिंसक हल्ला करून भाजप आणि संघ परिवाराने माझे वक्तव्य खरे ठरवले, असे ते म्हणाले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे वेळी लोकसभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ‘‘भाजप, संघ आणि मोदी म्हणजे हिंदुत्व नाही. भाजप, संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. हिंदुत्व हा काही भाजपचा ठेका नाही,’’ असे राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजपने देशभरात काँग्रेस विरोधात आंदोलने केली. गुजरातमध्ये भाजपने हिंसक आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी अहमदाबादेत काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. तुफान दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. काँग्रेस कार्यकत्यांनी याला विरोध केला. दगडफेकीत पोलीसही जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दरम्यान, गांधीनगर, राजकोटसह गुजरातच्या इतर शहरांमध्येही काँग्रेस कार्यालयांसमोर भाजपने आंदोलन केले.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, गुजरात काँग्रेस कार्यालयावरील भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराबाबतचा माझा मुद्दा आणखी मजबूत झाला आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत. गुजरातची जनता त्यांच्या खोटेपणावरून स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवेल. मी पुन्हा म्हणतोय – गुजरातमध्ये भारत जिंकणार आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून गुजरातमध्ये विजयाची हमी दिली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here