राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी वर्तविला अंदाज, भाजपाला देशात…

0

पुणे,दि.४: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी २४ जागा मिळतील, तर भाजपाला देशात २५० जागा मिळतील, असा अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी वर्तविला आहे. लोकसभा निवडणुकीत सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान जागा मिळतील, असे पवार म्हणाले. उत्तरेकडे भाजपा विरोधी, तर दक्षिणेकडे भाजपास दिलासा देणारी लाट आहे. परिणामी, भाजपची गाडी चारशे पार नव्हे, तर तीनशेच्या आत अडकणार आहे, असा अंदाज प्रकाश पवार यांनी शनिवारी पुणे येथे वर्तविला.  

उद्धव ठाकरे यांना चांगला प्रतिसाद

प्रकाश पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपने स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादवला आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. प्रादेशिक पातळीवरील लीडरशीप गेल्या दहा वर्षांत हतबल होती, ती आता मजबूत झाली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सर्वाधिक सहानुभूती दिसते. त्यांच्याकडे या खेपेला मुस्लिम मतेही मोठय़ा प्रमाणात वळू शकतात. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

आता देशात मतदानाचे दोन टप्पे झाले आहेत. भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. राज्यानुसार आकडेवारी केली, तर महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि राजस्थान या राज्यात समजा भाजपला फटका बसला, तर १० टक्के म्हटले तर ४० जागा जातील. दिल्ली, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी मिळून १० जागा गेल्या, तर एकूण ५० जागा कमी होतील. ३०३ मधून त्या कमी केल्या, तर २५० पर्यंत त्यांच्या जागा मर्यादित राहतील, असे त्यांनी सांगितले.  

नेते गेले तर जनता जायला तयार नाही

नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याच्या बरोबर लोक जातात का, या प्रश्नावर ते म्हणाले, इतर निवडणुकींपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. आता जनता नेत्याबरोबर फार कमी जात आहे. भाजपसोबत दोन मराठे चेहरे आहेत. शिंदे आणि अजित पवार दोघे सोबत असले तरी राज्यातील सर्व जागा काही ते जिंकू शकत नाहीत. कारण नेते गेले तर जनता जायला तयार नाही; पण त्या नेत्यांसोबत काही लोक नक्कीच जात असतात. एक नेता फुटला तर काही हजार मतदार फुटतात. त्या नेत्याकडे कोणती तरी सहकारी संस्था, कारखाना, शिक्षण संस्था असते. त्यातून काही हजार मते तिकडे जातात, असे पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here