मुंबई,दि.15: लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीने आम्हीच सत्तेवर बसणार असा दावा केला आहे. अब की बार 400 पार असा नारा भाजपाने दिला आहे. विविध न्युज वाहिन्यांचा सर्व्हे समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते रोज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक सभा घेत आहेत.
यातच, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपला तामिळनाडूमध्ये मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूतील सर्वच्या सर्व जागा विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत, सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, यांपैकी काँग्रेसला 9 आणि द्रमुक तथा आघाडीला 30 जागा मिळू शकतात. भाजपच्या खात्यात एक जागा जाण्याचाही अंदाज नाही. महत्वाचे म्हणजे येथे द्रमुक हा I.N.D.I.A.चा भाग आहे.
मात्र, या निवडणूक सर्वेक्षणातील महत्वाचे गोष्ट म्हणजे, भाजपच्या मतांची टक्केवारी लक्षणीय वाढणार असल्याचे दिसते. तामिळनाडूमध्ये एनडीएला 19 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर I.N.D.I.A. ला 52 टक्के, AIMDAK 23 टक्के आणि इतरांना 6 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.