मुंबई,दि.8: Chandrashekhar Bawankule On Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने अनेकांनी याचा निषेध केला. सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तार यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा निषेध करत सत्तार यांना सुनावले आहे. याचबरोबर त्यांनी याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ही केली आहे. या सगळ्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. दरम्यान सत्तार यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातारवण ढवळून निघाले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या सगळ्या घटनेवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री घेतील यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही. युती सरकारमध्ये मंत्र्यांनी अशी वक्तव्ये न करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये काही नेत्यांनी महिल्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आमच्याकडे दाखले आहेत. परंतु यावर वाद घालणे टाळावे. तसेच संजय राऊत यांनीही महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते हे विसरून चालणार नसल्याचे म्हणत सर्वांनी राजकीय शिष्टाचार पाळला पाहिजे अन्यथा राजकीय वातावरण बिघडू शकतो असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवार यांच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, महाविकास आघाडी काळात आदित्य ठाकरे मंत्री असताना 50 उदाहरणं सांगता येईल की जिथे महिलांचा अपमान झाला होता. महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षाच्या अधिकृत हॅंडलवरुन महिलांवर आक्षेपार्य टीका करण्यात आली होती. दरम्यान अजित पवार यांनी अद्यापही यावर काही वक्तव्य केले नाही यावर बावनकुळे म्हणाले की, ते बहीण भाऊ आहेत तो त्यांचा प्रश्न आहे यावर आम्ही काय बोलणार असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. तसेच भारत जोडो महाराष्ट्रात दाखल झाली यावर ते म्हणाले की, भारत जोडो यात्रा मातोश्रीवर गेली तरी काही फरक पडणार नाही.
यापूर्वी शिवसेनेची एवढी लाचारी आम्ही पाहिली नव्हती आता पाहत आहोत. तसेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत गेल्यास नवल वाटण्यासारखे काही नसल्याचे ते म्हणाले.