सोलापूर,दि.27: BJP Solapur Viral: घोटाळ्यात अडकलेल्या आणि जनतेची फसवणूक केलेल्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजपाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्वीकारले. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाकडे पोहोचवू असा शब्द दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार बबन शिंदे, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने हे भाजपात प्रवेश निश्चित करणार असल्याची चर्चा आहे. सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध करत आहेत. सोशल मिडीयावर भाजपा कार्यकर्त्यांनी निष्ठा की लाभ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मिडीयावर माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध होताना दिसत आहे.
भाजपा कार्यकर्त्यांची पोस्ट | BJP Solapur Viral
राजकारणात पक्षांतर नवे नाही. निवडणुकांच्या तोंडावर, एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हा आता जवळजवळ नेहमीचा भाग झाला आहे. कोणत्या पक्षाचा नेता भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो, हे महत्त्वाचे नाही; पण त्या प्रवेशा मागील उद्देश काय आहे, हे महत्त्वाचे आहे.
जे लोक कधीकाळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर टीका करत होते, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य शैलीवर प्रश्न उपस्थित करत होते, त्यांच्या वैयक्तिक जीवनावर, जातीवर, किंवा विचारांवर टीका करत होते — तेच आज “मोदींच्या हाताला बळ देण्यासाठी” भाजपमध्ये येतात, हे पाहून कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
भाजपचा कार्यकर्ता वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून काम करत असतो. केंद्र आणि राज्यातून येणारे पक्षाचे कार्यक्रम घराघरात पोहोचवतो, सदस्य नोंदणी करतो, प्रसार करतो, मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवतो. त्याची अपेक्षा मोठी नसते — फक्त पक्षाकडून मान्यता, थोडीशी दखल, आणि प्रामाणिक कामाचे कौतुक.
पण जेव्हा विरोधक राहिलेले, पक्षावर घणाघाती टीका करणारे लोक एका दिवसात “नवीन भाजपा कार्यकर्ता” म्हणून गौरवले जातात, तेव्हा मूळ कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. हे लोक खरंच पक्षाच्या विचार धारेवर विश्वास ठेवतात का? की केवळ निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे?
प्रश्न हा एखाद्या व्यक्तीविषयी नसून, निष्ठेच्या मूल्यांविषयी आहे. जेव्हा एखादा कार्यकर्ता आयुष्यभर कार्य करूनही फक्त “कार्यकर्ता” राहतो, आणि निष्ठावान नसलेले लोक थेट पद मिळवतात, तेव्हा ते अन्यायकारक वाटते.
भाजपचा कार्यकर्ता डगमगत नाही — पण तो अस्वस्थ नक्की होतो. कारण पक्ष त्याच्यासाठी फक्त संस्था नाही; ती त्याची श्रद्धा आहे, विचार आहे.
मग अशा वेळी पक्ष श्रेष्ठींनीही विचार करायला हवा की, पक्ष प्रवेशाचे दरवाजे खुले ठेवताना मूळ कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान कसा राखायचा? नवीन येणारे लोक पक्षाची ताकद वाढवतील, की मतांचे गणित मांडतील — हे समजून घेणे आवश्यक आहे.
राजकारणात संख्या महत्त्वाची असते, पण निष्ठा त्याहून महत्त्वाची असते. कारण संख्या निवडणूक जिंकवते, पण निष्ठा पक्ष टिकवते.
एक निष्ठावान भाजपा कार्यकर्ता
“निष्ठेचा प्रश्न — कार्यकर्त्यांची मन:स्थिती”
“संख्या की निष्ठा?”








