मुंबई,दि.18: BJP On Maharashtra Politics: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने शिंदे गटाबाबत चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह यावर दावा सांगितला होता. पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतून 40 आमदार व 13 खासदार शिंदे गटात सामील झाले. अपक्ष मिळून शिंदे गटाकडे 50 आमदार झाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
मात्र ठाकरेंविना शिवसेना चालवणं आता एकनाथ शिंदेंसमोर सगळ्यात मोठे आव्हान आहे. भाजपासोबत शिवसेना राज्यातील सत्तेत आहे. त्यात मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडे आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीला 1 वर्ष शिल्लक असताना शिवसेना-भाजपा किती जागा लढवतील यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? BJP On Maharashtra Politics
2024 च्या निवडणुकीत आपल्या जागा शंभर टक्के ज्या काही 150-170 येतील. पण आपण 240 जागा लढवण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेच्या शिवसेनेकडे 50 जागा आहेत. त्यावरती त्यांच्याकडे कुणी नाही. 240 जागा लढल्या तर अशावेळी तुम्हाला तुमची टीम अलर्ट करावी लागेल. तुम्हाला खूप काम आहे असं विधान बावनकुळेंनी प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत केले आहे.
भाजपाची सारवासारव
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर सर्व सोशल माध्यमातून तो हटवण्यात आला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी असं विधान केल्याचं म्हटलं अशी सारवासारव नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र भाजपाचा हा अंतर्गत कार्यक्रम होता. त्यात माध्यमांना प्रवेश नव्हता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी केलेले विधान हे भविष्यात या युतीचं चित्र कसं असू शकते हे स्पष्ट करणारे दिसते.
विरोधकांना आयतं कोलीत
अद्याप विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपाकडून सांगण्यात येत असले तरी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसलेल्या जबाबदार व्यक्तीने केलेले विधान निश्चित भविष्यातील युतीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट करणारे आहे. त्यात बावनकुळेंच्या विधानाचा आधार घेत विरोधकांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची कोंडी करण्यात येऊ शकते. बावनकुळेंचे विधान विरोधकांना शिंदेविरोधात मिळालेले आयतं कोलीत असल्याचंही म्हटलं जात आहे.