भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी मागितली माफी

0

मुंबई,दि.10: भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी माफी मागितली आहे. श्रीकांत भारतीय यांनी काल (दि.9) फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यावरून वाद निर्माण झाला होता. काल गुढीपाडव्याच्या दिवशी भारतीय यांच्या घरी पाळीव कुत्रा आणला. फेसबुकवर श्रीकांत भारतीय यांनी, आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन श्वान आणलं असून त्याचं नाव शंभू असं ठेवलं. अशी पोस्ट केली.

सोलापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ही पोस्ट डिलिट करण्याची मागणी केली होती. माऊली पवार यांनी भारतीय यांना आमच्या नादी लागू नका असा इशारा देत जर भारतीय यांनी ही पोस्ट डिलीट नाही केली तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज कुत्र्यांना देवेंद्र आणि नरेंद्र असे नाव ठेवेल असा इशारा दिला होता. मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. यानंतर भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे.

श्रीकांत भारतीय यांची फेसबुक पोस्ट

नमस्कार ! काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री गुरु दत्तात्रयाचे वाहन श्वानाचे घरी आगमन झाले. प्राणीतत्वामध्ये ईश्वर बघण्याची आपली संस्कृती आणि शिकवण !!!

‘शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो’ यातूनच हे नाव ठेवावं असा विचार आला. आम्ही दत्तात्रयाचे उपासक !! श्वान हे त्यांचं वाहन !!! स्वाभाविकपणे घर धार्मिक !!! म्हणून हे नाव.

पण दुर्दैवाने याचा विपर्यास केला गेला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमचा प्राण आहे. आम्ही 4 पिढ्या वारकरी आहोत. या जन्मात तर आहेच. पण जन्मोजन्मी धर्मवीर संभाजी महाराज हे आमचे दैवत राहील.

तथापि मी एक संवेदनशील राजकीय कार्यकर्ता आहे. गैरसमजातून सुद्धा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. त्यांची क्षमा मागतो. पण या मागची माझी पवित्र भावना समजून घ्यावी, अशी विनंती करतो.

जय जिजाऊ, जय शिवराय!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here