राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मंत्र्यानी मदत केल्याचा भाजपा आमदार संतोष दानवे यांचा दावा

0

दि.११: महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. राज्यसभेच्या सहा जागांपैकी भाजपाने तीन जागांवर विजय मिळवला. अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपाने विजय मिळवला. एकीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता भाजपच्या एका आमदाराने शिवसेनेच्या आमदाराने अपक्षांना सोबत घेण्यास १०० टक्के मदत केल्याचा मोठा दावा केला आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्षांनी दगाफटका केला. भाजपने घोडेबाजार केला. त्यामुळेच आमचा उमेदवार पराभूत झाला, असा आरोप केला. यानंतर आता भाजपचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी हा दावा केला आहे. यानंतर एकच खळबळ उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत झाली, असा गौप्यस्फोट संतोष दानवे यांनी यांनी केला आहे.

गद्दारांची यादीत अब्दुल सत्तार

संतोष दानवे जालन्यात माध्यमांशी बोलत होते. राज्यसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी भाजपला जशी मदत केली अशीच मदत ते विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा करतील, अशी अपेक्षा देखील संतोष दानवे यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करणाऱ्या गद्दारांच्या यादी आमच्याकडे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर बोलताना अपक्ष आमदार गद्दार नसून, संजय राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरवर असायला हवेत, असा कणखर टोला आमदार संतोष दानवे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते. त्यावर उत्तर देताना संतोष दानवे यांनी सत्तार यांच्यावर हा बॉंब टाकला. अब्दुल सत्तार हे ज्या पक्षात आहेत, ते त्या पक्षात कधीच नसतात. अब्दुल सत्तार हे ज्या पक्षाच्या पदावर असतात ते कधीच त्या पक्षासोबत नसतात. हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. अब्दुल सत्तार यांचे तोंडच असे आहे की, ते बाजारात फिरतात, अशी बोचरी टीका दानवे यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here