भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी

आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केले होते वक्तव्य

0

मुंबई,दि.४: भाजपा आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब विधान केलं आहे.

काल ( ३ नोव्हेंबर ) मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं म्हटलं होतं. प्रसाद लाड यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

जाहिरात

आमदार प्रसाद लाड काय म्हणाले होते?

कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली,” असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,” असा सल्ला राष्ट्रवादीने दिला.

आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसाद लाड यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here