भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.3: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. हिल लाईन पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये हा गोळीबार झाला, जिथे दोन राजकारणी आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी आमदाराला ताब्यात घेऊन अटक केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप

मला या कृत्याचा कसलाही पश्चाताप नसल्याचं सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे.

या हल्ल्यानंतर आपणच गोळीबार केल्याची कबुली देताना आमदार गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसाला आरोपी बनवत आहेत, असं आमदार गायकवाड यांनी ‘झी 24 तास’कडे नोंदवलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. गणपत गायकवाड यांना सकाळी साडेसातच्या सुमारस पोलिसांनी अटक केली आहे.

गणपत गायकवाड यांनी ZEE24 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवत आहेत. ते मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवलं आहे. मनस्ताप झाल्याने मी फायरिंग केली. या कृत्याचा मला काहीही पश्चाताप नाही. कारण माझ्यासमोर माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की करत असतील तर मी काय करणार? पोलिसांच्या धाडसामुळे महेश गायकवाड वाचला. पोलिसांनी धाडस करून मला पकडलं. मी महेश गायकवाडला जीवे मारणार नव्हतो. पण माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करावं लागलं.”

या घटनेनंतर ‘झी 24 तास’शी बोलताना गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याची कबुली दिली. “पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा घेतला. मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली,” असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना गणपत गायकवाड यांनी, “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे,” असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

तुम्ही पोलिसांसमोर 5 गोळ्या झाडल्या असा आरोप आहे, असं म्हणत गणपत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “हो मी स्वत: गोळ्या झाडल्या. मला काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलिसांसमोर जर मारत असतील तर मी काय करणार?” असा प्रश्न उपस्थित केला. “पोलिसांनी पकडलं मला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझ्याबरोबर असं कोणी करत असेल पोलिसांसमोर तर मला आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रभर असेच गुन्हेगार पाळून ठेवलेले आहेत,” असं आमदार गणपत गायकवाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here