नवी दिल्ली,दि.19: महापौर निवडणुकीत कथित छेडछाड केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी संध्याकाळी भाजप नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांनी 30 जानेवारी रोजी आम आदमी पक्षाच्या कुलदीप कुमार यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. मात्र, या निवडणुकीच्या निकालाला विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. भाजपला 16 मते मिळाली होती आणि काँग्रेस आणि आपचे संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांना केवळ 12 मते मिळाली होती. आप आणि काँग्रेसची 8 मते अवैध ठरली. ज्याला काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने विरोध केला होता. दरम्यान, बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तीन नगरसेवकांच्या बाजू बदलल्याने आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीला मोठा धक्का बसला आहे. भाजप समर्थक नगरसेवकांची संख्या आता 19 वर पोहोचली आहे. यापूर्वी हा आकडा केवळ 16 होता. सदनात विजयासाठी संख्या फक्त 19 आहे. चंदीगडमध्ये भाजपचे 14 नगरसेवक आहेत. एसएडीला एक जागा तर चंदीगडच्या खासदारालाही या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. या दोघांची मिळून भाजपकडे 16 मते होती. आता आपच्या तीन नगरसेवकांनी बाजू बदलल्यानंतर ही संख्या 19 वर पोहोचली आहे.
चंडीगड महानगरपालिकेतील आपचे 3 नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले आहेत. नेहा मुसावट, गुरचरण काला आणि पूनम देवी यांनी चंडीगडमधील भाजपाचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या तिघांनीही भाजपात प्रवेश केला.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लोककल्याणकारी धोरणामुळे प्रभावित होऊन चंडीगडमधील पूनम देवी, नेहा मुसावट आणि गुरचरण काला हे आपचे तीन नगरसेवक आज भाजपामध्ये दाखल झाले आहेत, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने रिटर्निंग ऑफिसरला चांगलेच फटकारले होते. सीजेआय डीवाय चंद्रचूड म्हणाले होते की रिटर्निंग ऑफिसरने जे केले ते लोकशाहीची हत्या आहे. तो कॅमेऱ्यात डोकावून मतपत्रिका नष्ट करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी.