भाजपा नेत्याची पंकजा मुंडेंबाबत मोठी मागणी

0

अहमदनगर,दि.7: अजित पवार गटाच्या आमदाराच्या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

नगरमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असताना भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात येत आहे.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. त्यामुळे आता महायुतीत अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ होणार, हे निश्चित झाले होते.

सुजय विखे-पाटील यांचा दारुण पराभव झाल्यानंतर नगरचे समीकरण बदलणार व त्यामध्ये आता स्थानिक पातळीवर सुद्धा निवडणुका होणार आहेत. तेथे सुद्धा महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निश्चय जाहीर केलेला असतानाच दुसरीकडे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल व कुरघोडी सुरू झालेल्या आहेत.

गेल्या दोन टर्मपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे नगर शहरातून निवडून आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप व अजित पवार गट हे एकत्रितरित्या विखे पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विखे यांना निवडून आणण्यात यश आले नाही.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन पंकजा मुंडे यांना नगर या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांना हे पत्र देताना महायुतीचे घटक पक्षाचे आमदार येथे नेतृत्व करतात याचा विसर पडला असावा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here