सोलापूर,दि.18:Bijju Pradhane: सोलापूर (Solapur) शहर भारतीय जनता (BJP) पार्टीचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) यांनी राजीनामा दिला आहे. बिज्जू प्रधाने यांनी भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. प्रधाने यांनी लिहिलेल्या पत्रात आपण भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहोत असे लिहिले आहे.
1995 पासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी 2012 व 2017 ला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्यावतीने निवडणूक लढवली. मात्र पक्षाने पाठबळ देण्याच्या ऐवजी माझे खच्चीकरण केले. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे, असे बिज्जू प्रधाने राजीनामा दिल्यानंतर म्हणाले.
बिज्जू प्रधाने हे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र पक्षात त्यांची अवहेलना होत होती असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. बिज्जू प्रधाने यांना मुद्दाम डावलले जात आहे अशी धारणा कार्यकर्त्यांची झाली होती. मागील महापालिका निवडणुकीत त्यांना त्यांचा वार्ड सोडून दुसरीकडे तिकीट देण्यात आले होते. यात बिज्जू प्रधाने यांचा थोडक्यात पराभव झाला. पक्षातील लोकांनीच दगा दिल्यामुळे बिज्जू प्रधाने यांचा पराभव झाला.