शिवसेनेने उचलले मोठे पाऊल, सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी

0

मुंबई,दि.२२: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपा बरोबर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून २२ जून म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला हजर राहावं यासाठी आदेश दिले आहेत. सायंकाळी ५ वाजता ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर घेण्यात येणार आहे. त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वांना व्हीप जारी केला आहे. या पत्रात म्हटलंय की, राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राजकीय परिस्थिती लक्षात घेता याला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर २२ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे. 

तसेच ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई मेल पत्त्यावर पाठवलेली आहे. त्या व्यतिरिक्त समाज माध्यमे, व्हॉट्सअप, एसएमएसद्वारे कळवले आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध, पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणांस गैरहजर राहता येणार नाही. या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here