धाराशिव,दि.24: राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमावरून प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धाराशीवमध्ये माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम झाला. देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. 500 वर्षानंतर रामलला अयोध्येत विराजमान झाले.
राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायला विरोध नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मात्र या कार्यक्रमावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असं मोठं आणि खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
भारत देशात धर्माचा प्रचार, प्रसार करायला पाहिजे. पण त्याअगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे. रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. पण आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.