भीमाशंकर ज्योतिर्लिंग: आसाम सरकारच्या ज्योतिर्लिंगावरील जाहिराती वरून मोठा वाद

भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरील आसाम सरकारच्या जाहिरातवरून वाद

0

मुंबई,दि.१५: भीमाशंकर ज्योतिर्लिंग: भारतात १२ ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगाचे भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात. यातील काही ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, देशभरातले शिवभक्त येथे भगवान शंकारच्या दर्शनासाठी येतात. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग आहे. परंतु आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा हे महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकारने केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला केलं लक्ष्य | भीमाशंकर ज्योतिर्लिंग

भाजपशासित आसाम सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरुन आता मोठा वाद उफाळू शकतो. आसाम सरकारच्या या दाव्यानंतर राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून भाजपाला ठणकावलं आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!

सुप्रिया सुळे यांचे ट्विट

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, श्री शिवशंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ (पुणे) हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम सरकारने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे.

सुप्रिया सुळेंनी दिला पुरावा

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढच्या ट्विटमध्ये सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचा पुरावा देखील दिला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात सुळे यांनी लिहिलं आहे की, “श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.”

तातडीने दखल घेण्याची मागणी

दरम्यान, सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी राज्याचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.

सचिन सावंत यांनी केला सरकारचा निषेध

दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील भाजपावर हल्लाबोल केला आहे. सावंत यांनी देखील ट्विट केलं आहे. सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपाच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकर येथील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.”

दुसऱ्या ट्विटमध्ये सावंत यांनी म्हटलं आहे की, “शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध नोंदवला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here