मुंबई,दि.30: काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. या निकालावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे 132 उमेदवार निवडून आले आहेत. तर महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएम छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले आमदार भाई जगताप?
हा निकाल महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. तसेच त्यांच्यापैकी अनेकांकडून इव्हीएम आणि या निकालांबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय, असं विधान भाई जगताप यांनी केलं आहे.
आपली लोकशाही खूप मोठी आहे. ती जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीवर जर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. पण लोकशाहीला सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सगळ्या संस्था कुत्रा बनून नरेंद्र मोदींच्या दारासमोर बसतात, असं भाई जगताप म्हणाले.