अहमदनगर,दि.18: भगवद्गीतेचा (Bhagwat Geeta) अभ्यासक्रमात समावेश करण्याचा महत्वाचा निर्णय भाजपा (bjp) राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता (Bhagwat Geeta) शिकवली जाईल. गुजरातमधील (Gujrat) सर्व शाळांमध्ये महाकाव्य भगवद्गीता हे अनिवार्य करण्यात आलं आहे. गुजरातचे शिक्षण मंत्री जीतू वघानी (Jitu Vaghan) यांनी हा निर्णय घेतला आहे. “इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवली जाईल,” असं जीतू वघानी म्हणाले.
भारतीय संस्कृती आणि ज्ञान प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांमध्ये भगवद्गीतेतील मूल्ये आणि तत्त्वांची आवड निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. अभ्यासक्रमाबरोबरच प्रार्थना इत्यादी कार्यक्रमांमध्ये गीतेचाही समावेश केला जाणार आहे. गुजरातमधील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होईल असं म्हटलं जात आहे.
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत निर्णय
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत काही मूलभूत तत्त्वे करण्यात आली आहेत. यापैकी एक तत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती आणि ज्ञान प्रणाली तसेच परंपरांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृतीची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
शिक्षण मंत्री जीतू वघानी म्हणाले, भगवद्गीतेचा परिचय भागांमध्ये केला जाईल. हा पवित्र ग्रंथ इयत्ता सहावी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि मजकुराच्या स्वरुपात सादर केला जाईल. तर इयत्ता नववी ते बारावीसाठी, ते प्रथम भाषेतील पाठ्यपुस्तकात कथा आणि मजकुराच्या स्वरुपात सादर केला जाईल.
गुजरातमधील शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याच्या या नव्या कल्पनेबद्दल अधिक बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले, “भगवद्गीतेचा मजकूर प्रार्थना कार्यक्रमात समाविष्ट केला पाहिजे. अशी शक्यता आहे की पाठ्यपुस्तकांमध्ये एकतर सुधारणा केली जातील किंवा नवीन पुस्तकं सादर केली जातील, जी केवळ भगवद्गीतेपासून माहिती मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतील.
अनेक प्रकारच्या स्पर्धा असतील
अभ्यासक्रमांतर्गत भगवद्गीतेवर आधारित श्लोक, निबंध, नाटक, चित्रकला, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध स्पर्धा आणि सर्जनशील उपक्रम शाळांमध्ये आयोजित केले जातील. अभ्यास साहित्य प्रिंट, ऑडिओ आणि व्हिज्युअल स्वरुपात दिले जाईल.
यापूर्वी मध्य प्रदेशात रामायण, महाभारत या महाकाव्यांचा राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत अभियांत्रिकी शिक्षण अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता.