सांगली,दि.२४: ‘भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही…’ असे वक्तव्य सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. मावळमधील एका कार्यक्रमात त्यांनी गंमतीनं हे वक्तव्य केलेलं असलं तरी त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर आता अजून एका भाजपा नेत्याने या प्रकारचं वक्तव्य केलं आहे. वक्तव्यांचा विपर्यास केल्याचा दावा जरी भाजपाकडून केला जात असला, तरी ऑन कॅमेरा हे वक्तव्य आल्यामुळे त्यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार संजय काका पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना संजय काका पाटील यांनी आर्थिक गोष्टींवर मिश्किलपणे बोलताना ईडीची कारवाई आणि भाजपाचं संरक्षण या आशयावर केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही”, असं संजय काका पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर आता राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून देखील आक्षेप घेतला जात आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना संजय काका पाटील यांनी कर्ज काढून गाड्या खरेदी करत असल्याचं सांगितलं. “आम्ही राजकीय माणसं कर्ज काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. लोकांना दिसलं पाहिजे की आमच्याकडे भरपूर आहे. पण आम्ही बँकेचं कर्ज काढून ४० लाखांची गाडी घेणार. मी वस्तुस्थिती मांडतोय. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर रेकॉर्डिंग झालं तरी हरकत नाही. आमचे कर्जाचे आकडे तुम्ही जर बघितले…गंमती गंमतीत हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की भाजपामध्ये आल्यापासून झोप चांगली लागते. तसं ईडीनं आमची कर्ज बघितली, तर म्हणतील ही माणसं आहेत का काय आहेत”, असं संजय काका पाटील यावेळी म्हणाले.