लोकसभा निवडणूक निकाला आधीच लागले विजयाचे बॅनर

0

बारामती,दि.18: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच तर देशात सात टप्प्यात होत आहे. चार टप्पे पूर्ण झाले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. बारामती लोकसभा मतदारसंघाचे 7 मे रोजी मतदान पार पडले. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.

4 जूनला निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अति उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे. भोर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे बॅनर लागले आहे.

कोण म्हणतोय येत नाय

पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहे. “सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, गुलाल आपलाच..”कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय”, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे–सातारा महामार्गावर ‘गुलाल आपलाच’ असा आशय लिहिलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आहे.

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे. त्यातच निकाल आधीच पुणे सातारा महामार्गावर सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे फलक लागल्यानं, हे फलक रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here