बँक ऑफ महाराष्ट्रावर भरदिवसा दरोडा, रक्कम आणि कोट्यवधींचे सोने लंपास

0

पुणे,दि.21: जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्रावर (Bank Of Maharashtra) भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (Pimperkhed) येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पिस्तुलीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

बँकेवर दरोडा टाकण्यात आल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्वाचा संदेश पाठवण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा पडला असून दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचं बोललं जात आहे.

5-6 दरोडेखोरांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. सदर गाडीतून आरोपी नगर दिशेला पळून गेले आहेत. शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करा. तसेच या वर्णाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास अगर काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे. ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने सदरची गाडी व इसम पकडून ठेवावे असा संदेश पाठवण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here