Aurangabad: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कन्नड तालुक्यात बंदची हाक

Aurangabad News: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे

0

औरंगाबाद,दि.22: Aurangabad News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कन्नड तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhansu Trivedi) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या विरोधात राज्यात मोठा संताप पाहायला मिळत आहे.

दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी या बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत जाधव यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीवर याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान यावी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं, असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केले होते. त्रिवेदी यांच्या या विधानाने राज्यभरात संताप पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहे. तर विरोधकांकडून देखील भाजपवर टीका केली जाते. अशातच त्रिवेदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्याकडून बंदची हाक

हर्षवर्धन जाधव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपला मस्ती चढली आहे. त्यामुळे यांचा निषेध म्हणून आज सर्वांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला पाहिजे. सत्ता आल्यावर वाटेल ते बोलणाऱ्या भाजपला कळू द्या अजून ते एवढे मोठे झाले नाही. त्यामुळे आज बंद म्हणज बंद… महाराष्ट्र बंद असेही जाधव यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे आज कन्नड शहरात बहुतांश ठिकाणी दुकाने बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुस्लिम समाज देखील सहभाग घेणार

याचवेळी हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय नेत्यांवर देखील टीका केली आहे. शिवरायांचा अपमान झाल्यावर आज मी बोंबलतोय, पण कुठे गेले खैरे आणि त्यांचे हिंदुत्व असे जाधव म्हणाले. तर स्वतःला हिंदू म्हणून सांगणाऱ्यांना ओढून विचारा, सांगा दुकान बंद करा म्हणून असेही जाधव म्हणाले. तर आजच्या बंद मध्ये मुस्लिम समाज देखील सहभाग घेणार असल्याचा दावाही जाधव यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here