आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकारास जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.४: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकारास जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात हकिकत अशी की, मौजे पुळुजवाडी, ता. पंढरपूर येथील रहिवासी लिंगदेव कृष्णा सलगर याचेसह इतर लोकांविरुध्द एकास व्याजाने पैसे देवून त्याची जमीन गहाणवट ठेवून घेतली व त्या इसमाने सगळे पैसे परत देवुनसुध्दा सदर आरोपींनी त्यास जास्त व्याजाची मागणी केली व दमदाटी केली त्यामुळे व्याजाने कर्ज घेणा-याने २७/०५/२०२३ रोजी आत्महत्या केली व अशा प्रकारे व्याजाने पैसे घेणा-यास त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दि. २९/०५/२०२३ रोजी कामती पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. यातील फिर्यादी वसंत पवार याचे असे म्हणणे होते की त्यांचा मुलगा सोमनाथ पवार रा. मौजे कोथाळे, ता. मोहोळ याने आरोपी लिंगदेव कृष्णा सलगर व इतर आरोपी यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते व त्यापोटी सोमनाथ पवार याने त्याची जमीन सदर आरोपींकडे गहाण ठेवली होती.

पण सदर वसंत पवार यांनी त्यांची इतर ठिकाणी असलेली जमीन विकून सदर आरोपींचे पैसे परत केलेले होते तरीही सदर आरोपी सदर सोमनाथ यास व्याजाच्या पैश्यासाठी सतत त्रास देत होते त्यामुळे सोमनाथ पवार याने दि. २७/०५/२०२३ रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्याप्रकरणी आरोपी लिंगदेव कृष्णा सलगर यास अटक करण्यात आली होती.

सदर कामी जामीन मिळण्यापोटी सदर आरोपीने ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.

यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, एखाद्यास व्याजाने दिलेले पैसे परत मागणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणता येणार नाही. तसेच सदर मयत सोमनाथ पवार याने दिलेला मृत्यूपूर्व जबाब हा कायदयाच्या दृष्टीकोनातून भक्कम पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. तसेच सदर फिर्याद दाखल करण्यास दोन दिवसांचा उशिर झालेला असून तो का झाला याच्याबद्दल कुठेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.

सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी नामे लिंगदेव कृष्णा सलगर याची जामीनावर मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राम शिंदे, ॲड. सुमित लवटे, ॲड. फैयाज शेख यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here