मुंबई,दि.१८: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी विधानसभेत राजकारण्यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. येणारा पाऊस धो-धो पडला तर तो दिसतो. पण सरकारी धोरणं जे तलवार चालवतात त्याचे काय? आम्ही सगळे मिळून कसायासारखे शेतकऱ्याला हळूहळू कापतो ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक, आमच्याएवढे नालायक कुणीच नाही. जखम झाल्यावर त्यावर मीठ टाकणारी आपण औलाद आहोत. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं अशा शब्दात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत घणाघात केला.
बच्चू कडू म्हणाले की, अतिवृष्टीवर आपण चर्चा करतो पण धोरणावर कुणी चर्चा करत नाही. पाऊस एकदा पडून निघून जातो परंतु राजकारण्यांनी बनवलेली धोरणं शेतकऱ्यांना आत्महत्येपर्यंत घेऊन जातात हे तपासून पाहिले पाहिजे. आज इकडचे तिकडे गेले. सत्ता बदलली पण प्रश्न तेच आहेत. बोलणाऱ्यांचे चेहरे बदलतात. जेवढं नुकसान अतिवृष्टीने झालं नाही त्यापेक्षा जास्त नुकसान धोरणामुळे झालंय असं त्यांनी सांगितले.
तसेच एका पावसाने नदी, नाले भरतात त्याचे नुकसान आहेत तसे फायदेही आहेत. दुष्काळ आहे तिथे पाणी आले. धरणं भरली. काँग्रेस सत्तेत असताना स्वामिनाथन आयोगावर अंमलबजावणी केली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्या असत्या. भाजपा सरकार आले त्यांनीही हात वर केले. मी कुठल्या पक्षाचा हा विषय महत्त्वाचा नाही. कुठल्या बाजूने बसलो हे महत्त्वाचं नाही. जो कष्ट करणारा शेतकरी आहे. घाम गाळतोय, त्याच्या हाती येतं काय? असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला.
दरम्यान, पक्षाविरोधात बोलता येत नाही. पक्षविरोधी कायदा संपवून टाकला पाहिजे. पक्षांनी मक्तेदारी सुरू केली आहे. तुमच्या भागात एखादं नुकसान झालं, कायदा आडवा येत असेल तर मी बोलू शकत नाही कारण माझ्या पक्षाचे सरकार आहे. अमेरिकेत कुठे पक्ष आहेत? मते जनतेची आणि हुकुमशहा नेत्यांची. अतिवृष्टीत नुकसान झाल्यावर देतो किती तर ५ हजार. घराचं छप्पर पडलं. घरात काहीच राहत नाही. सगळं उद्ध्वस्त होतं. कधी कधी लाज वाटते. त्यांना ५ हजार देतात. त्यात काय होणार? असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला.
घर द्यायचं असेल तर सर्व्हे करण्याचं गरज काय? नदी, नाल्यात जेवढे मेले नाहीत तितकेच घर पडून मेले. झोपेत माणसं मेली. मातीची घरे. घरांच्या इतक्या योजना राबवल्या जातात मग खरा लाभार्थी गेला कुठे? पडलेले घर तुम्हाला दिसत नाही. कोण आहेत ते नालायक अधिकारी? घर घ्यायचं असेल तर दारिद्र्य कार्डात नावं असायला हवं. कुणी आणले हे निकष? अशा अधिकाऱ्यांना लाथा मारायला हव्यात असंही बच्चू कडू संतापून म्हणाले.