Bachchu Kadu: आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही बच्चू कडूंचा इशारा

0

मुंबई,दि.1: आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्यावर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी गंभीर आरोप केले होते. ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना दिला आहे. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर मेळाव्याला बच्चू कडू यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले.

‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है’ म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मोळाव्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. पहिली चूक आहे म्हणून माफ केलं पण यानंतर जर कोणी वार केला तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत कडू यांनी राणा यांना स्पष्ट इशारा दिला.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, आम्ही राजकारणासाठी दिव्यांगांचा कधीही वापर केला नाही. तर आम्ही दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलो. सत्तेसाठी कधीही लाचारी केली नाही. सत्ता आणि पदापेक्षा माझ्यासाठी माझी लोकं महत्त्वाची आहेत. मी महात्मा गांधी यांना मानतो. मात्र माझ्या डोक्यात भगतसिंग आहेत, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे असा इशाराही त्यांनी दिला. पहिली वेळ होती म्हणून माफ केल्याचे म्हणत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर एक पाऊल मागे घेतले असल्याचे दिसून आले.

मात्र, यापुढे कोणी ‘वार’ केला तर ‘प्रहार’ केल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशाराही यावेळी कडू यांनी दिला. आम्ही कोणत्या पक्षाचा नव्हे तर विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आमच्यापासून सावध रहा. आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी, सहन झालं नाही तर सोडून जाऊ पण तुम्हाला सोडणार नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी थांबल्या. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आमदार रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज अमरावती येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here