दि.30: China Baby Bonus: प्रदीर्घ काळापासून सिंगल चाइल्ड पॉलिसीचा (single child policy) अवलंब केल्यामुळे, गेल्या काही वर्षांत चीनच्या (China) लोकसंख्येमध्ये एक विचित्र संकट निर्माण झाले आहे. चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये वृद्ध लोक अधिक होऊ लागले आणि कामाच्या वयाच्या लोकांच्या कमतरतेचे संकट आले. यामुळे घाबरलेल्या चिनी सरकारने आता अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे. तिसर्या मुलाच्या जन्मावर, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक वर्षाची सुट्टी आणि 11.50 लाख रुपयांचा बोनस देत आहे.
शासनाकडूनही मिळत आहे प्रोत्साहन
नॅशनल बिझनेस डेली या चिनी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, चीनमध्ये बेबी बोनस(Baby Bonus), वाढीव पगार, कर सूट, मुलांच्या संगोपनासाठी सबसिडी यांसारखे प्रोत्साहन दिले जात आहे. लोकांना तिसरे अपत्य होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा संपूर्ण प्रयत्न आहे. सरकारसोबतच कंपन्याही लोकांना त्यांच्या वतीने बोनस देत आहेत.