मुंबई,दि.13: Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास गोळीबार केला. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीवर लागली.
वांद्रे पूर्वमधील खेरवाडीत सिद्दिकी यांचा मुलगा आ. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर काही जण फटाके फोडत होते. त्याच वेळी बाबा सिद्दिकींवर तीन जणांनी गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या छातीला लागली. त्यानंतर सिद्दिकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.
पुनर्विकास प्रकल्पाच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन आरोपींनी पोलिसांनी अटक केल्याचं पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
दोन बंदुकींमधून सिद्दिकी यांच्यावर सव्वानऊच्या सुमारास चार ते पाच राउंड फायर करण्यात आले. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या सहकाऱ्याच्या पायावर गोळी लागली आहे. घटनेनंतर झिशान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता संजय दत्त, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तातडीने रुग्णालयात पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घटनेची माहिती घेतली.