अतुल लोंढे यांनी केला किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा : किरीट सोमय्या यांना कोर्टाचे समन्स

0

नागपूर,दि.१०: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर जिल्हा न्यायालयात मानहानीचा दावा केला आहे. या प्रकरणी नागपुरातील दिवाणी न्यायालयाने सोमय्यांना समन्स बजावला आहे.

राज्य सरकार वसुली करते, हा वसुलीचा पैसा तिन्ही पक्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी ४० टक्के तर काँग्रेसला २० टक्के असा विभागला जातो, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. हा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा करीत लोंढे यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला आहे. यात मानहानीची सांकेतिक रक्कम ही १ रुपया इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच सोमय्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसुद्धा व्हावी अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

लोंढे यांनी त्याचे वकील सतीश उके यांच्यामार्फत सोमय्या यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी अशा दोन याचिका दाखल केल्या. लोंढे यांनी दाखल केलेल्या याचिकांनुसार, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करीत आहेत. टीका करताना त्यांचा तोल ढळतो. यामुळे काँग्रेस पक्षाची नाहक बदनामी होत आहे. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात ते बोलतात. मात्र त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे काँग्रेसची बदनामी केल्याने त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच मानहानी केल्यामुळे १ रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

यातील दिवाणी न्यायालयाने सोमय्या यांना समन्स बजावला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला ठेवण्यात आली असून सोमय्यांनी स्वत: हजर रहावे अथवा वकिलामार्फत आपली बाजू मांडावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here