दि.27 : अंधश्रद्धेतून अनेकजण अघोरी कृत्य करतात. भोंदू लोकांच्या नादी लागून काहीही अघोरी कृत्य करतात. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. जालना (Jalna) जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी याठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने गुप्तधन मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पीडितेनं वेळीच प्रसंगावधान दाखवत पतीचा विरोध केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीसह एका व्यक्तीला आणि मांत्रिक महिलेला अटक (3 arrested) करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संतोष पिंपळे असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तो जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहे. आरोपी संतोषला दारूचं व्यसन असून तो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला आहे. अशात त्याने गुप्तधन शोधण्यासाठी एका मांत्रिक महिलेच्या मदतीने आपल्याच पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण फिर्यादी महिलेनं वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, 22 सप्टेंबर रोजी बुधवारी रात्री आरोपी पती संतोष पिंपळेसह जीवन पिंपळे आणि एक मांत्रिक महिला फिर्यादीच्या घरी आले होते. त्यांनी घरातील लाकडी खांबाला काहीतरी धरबंधन करून निघून गेले. त्यानंतर आरोपी संतोषने आपल्या पत्नीच्या अंगाला हळद-कुंकू आणि अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं काय चालू आहे म्हणून घाबरलेल्या फिर्यादीने पतीचा विरोध केला. पण पतीने दमदाटी करत तिला मारहाण केली.
पतीने मारहाण केल्याने फिर्यादी महिलेनं आरडाओरड केली. त्यामुळे फिर्यादीचा मुलगा आणि शेजारील लोक घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादीची आरोपी पतीच्या तावडीतून सुटका केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपी पती संतोष पिंपळे आणि जीवन पिंपळे या दोघांना अटक केली. संबंधितांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी रविवारी मांत्रिक महिलेला देखील अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.