ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला

0

नांदेड,दि.8: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. याबाबत दैनिक लोकमतने वृत्त दिले आहे. हाके हे नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले होते. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्यावर यापूर्वी पुण्यातही हल्ला झाला होता.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मण हाके लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन सुरनर यांच्या प्रचारासाठी आले होते. प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता, पहिल्यांदा गाडीच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली. हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोर एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

हाके म्हणाले, ‘आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलो होतो. बाचोटीतून आमच्या गाड्यांचा ताफा चालला होता, त्यावेळी 100 ते 150 तरुणांच्या गटाने लाठ्याकाठ्या घेऊन आमच्या कारवर हल्ला केला. हा हल्ला भ्याड आणि जीवघेणा हल्ला असल्याचं म्हटलं. आमचा जीव घेऊन कुणाचं ध्येय साध्य करायचं असेल तर तयार आहोत, असं हाके म्हणाले.  आमने सामने यायची हल्लेखोरांमध्ये धमक नाही. यांच्यात समोरासमोर येऊन लढायचा दम नाही. बाचोटी गावातील तरुण होते, त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. जरांगेंच्या नावानं घोषणा देत होते. आता निवडणुकीतून माघार घ्यायची का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिलं जाणार की नाही?’ असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

यावेळी ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले, त्यांनीही घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद शमवला, अशी माहिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here