गतिमंद मुलीवर दुष्कर्म ; तरुणास १२ वर्षांचा कारावास

0

सोलापूर,दि.१६: एका गतिमंद मुलीवर सार्वजनिक शौचालयात दुष्कर्म करून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या नरेश जनार्दन कोंडा ( वय २१, रा. सोलापूर ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी १२ वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

आरोपी आणि पीडिता राहण्यास एकाच परिसरात आहेत. यामुळे आरोपीला पीडिता गतिमंद असल्याची माहिती होती. घटनेच्या दिवशी पीडिता शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केले. अत्याचाराबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

याबाबत पोलिसात फिर्याद दाखल होताच, सहायक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. गंपले यांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी आणि तपास केला. त्यानंतर आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पीडिता आणि डाक्टरांचा जबाब तसेच वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले.

घटनेशी संबंधित पुरावे सरकारतर्फे न्यायालयासमोर सादर केले. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांनी आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आणि एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, आरोपीच्यावतीने ॲड. दीपक सुरवसे आणि ॲड. दिलीप जगताप यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here