पुणे,दि.२३: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) ब्राह्मण समाज वादावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. सोलापूरसह अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
गुरुवारी पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून मिटकरींविरोधात आंदोलन करण्यात आलं असता वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. दरम्यान आता या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत असताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. अशातच आता या प्रकरणावर पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवलेंनी भाष्य केलंय.
आठवले यांनी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट मिटकरींचा उल्लेख करत या प्रकरणावरुन भाष्य केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी नाहीत अशी आपली पूर्वीची भूमिका कायम ठेवतानच आठवलेंनी मिटकरींवर मात्र टीका केलीय.
“शरद पवार यांच्यामुळे जातीवाद वाढला नाही,असं माझं मत आहे. पण त्यांच्या काही लोकांमुळे जातीवाद वाढला आहे. अमोल मिटकरींसारखे लोक आहेत जे समाजात तेढ निर्माण करतात. मिटकरींचा निषेध व्यक्त करतो, पवार जातीयवादी नाहीत,” असं आठवले यांनी म्हटलंय.