विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधानाने चर्चेला उधाण

0

मुंबई,दि.9: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या विधानाने चर्चेला उधाण आले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरच आपण क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ ‘दौलत’चे प्रकाशन बुधवारी येथे झाले. त्यावेळी नार्वेकर म्हणाले, ज्या – ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केले, त्या – त्या खात्यात क्रांतिकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्याकडे सोपविलेली सर्वात महत्त्वाची जबाबदारी 1977-78 या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम. सातत्याने माझा उल्लेख सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे माझे वय सगळ्यांनाच माहिती असेल.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?

77 साली माझा जन्म झाला आणि त्याच वर्षी बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ज्याप्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतिकारी निर्णय घेतले, त्यातून बरंचसं शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन.

गिरीश महाजनांनी लावला डोक्याला हात

विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित गिरीश महाजनांनी डोक्याला हात लावला. तेव्हा श्रोत्यांतून आलेल्या प्रतिक्रिया पाहून नार्वेकर यांनी ‘चिंता करायची गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेले नाही’, असे म्हणत बाजू सावरून घेतली. त्यावर गिरीश महाजनांनी बसल्या बसल्याच ‘मेरिटवर निर्णय’ असं हसत म्हणताच नार्वेकरांनी त्याला दुजोरा देत ‘मेरिटवर निर्णय घेईन,’ असे सांगितले. 

…तर सर्वोच्च न्यायालयात जाणार : खा. संजय राऊत

आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा मान ठेवतो. महाराष्ट्रात घटनेचा खून होणार नाही, असे मला वाटते. विधानसभा अध्यक्षांनी जर 90 दिवसांत निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ. मेरिट काय आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे सूचक विधान खा. संजय राऊत यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरा शिवसेना पक्ष कोणता, हे ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांच्या पक्ष घटना मागवल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here