नवी दिल्ली,दि.16: ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या चर्चेदरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता सार्वत्रिक निवडणुकांसोबतच राज्यांच्या निवडणुकाही होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभेसोबतच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाऊ शकतात, याचे रहस्य 3 वाजताच उलगडणार असल्याचे बोलले जात आहे.
आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभांचा कार्यकाळ जून महिन्यात वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. आता एप्रिल ते मे या कालावधीत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश!
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, एप्रिल-मेमध्ये येथे निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
जर येथे लोकसभेसोबत निवडणुका झाल्या, तर कलम 370 रद्द केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असेल. परिसीमनानंतर विधानसभेच्या जागा 83 वरून 90 झाल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी सात आणि अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अरुणाचलच्या निवडणुका लोकसभेसोबत निश्चित!
लोकसभेसोबत अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार असून, यावर भाजपनेही मंजुरीची शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाने आपले 60 उमेदवारही जाहीर केले आहेत. या यादीत चार महिलांचा समावेश आहे. या यादीत काँग्रेसचे तीन माजी आमदार निनॉन्ग एरिंग, लोम्बो तायेंग आणि वांगलिंग लोआंगडोंग यांना पासीघाट पश्चिम, मेबो आणि बोरदुरिया-बोगापानी या जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.
2019 मध्ये आंध्र प्रदेशात एकाचवेळी निवडणुका झाल्या
11 एप्रिल रोजी लोकसभेसोबत आंध्र प्रदेशमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्या. एकाच टप्प्यात सर्व 175 विधानसभा आणि 25 संसदीय जागांसाठी एकाच वेळी निवडणुका झाल्या. वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष YSRCP ने 151 विधानसभा आणि 17 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. तर एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीला विधानसभेत 23 आणि लोकसभेत 3 जागा मिळाल्या. यावेळी भाजपने टीडीपीसोबत युती केली आहे.
ओडिशा आणि सिक्कीम निवडणुका
ओडिशामध्ये 2019 मध्ये 11 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान विधानसभा निवडणुका झाल्या. नवीन पटनायक येथे 20 वर्षांपासून सत्तेत आहेत आणि त्यांचा पक्ष बीजेडीने 2019 मध्ये 147 जागांच्या विधानसभेत 117 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेसोबत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 16 तर भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या. यावेळीही येथे लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मानले जात आहे. सिक्कीममध्येही 11 एप्रिलला लोकसभेसोबतच निवडणुका झाल्या.