दि.१०: Assembly Elections Result 2022: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू होणार असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आघाडीवर आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (AAP) आघाडीवर आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. एकीकडे मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी EVM पूर्ण सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक आहे. मतमोजणी केंद्रावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळतो. EVM वर भरवसा ठेवला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
अखिलेश यादव यांनी केला होता आरोप
चुरशीच्या झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्चला आटोपले. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार येईल, असा कल वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली.. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून EVMशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला होता.