जयपुर,दि.24: Ashok Gehlot, iPhone 13: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बुधवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याकडे वित्त खातेही आहे. अर्थसंकल्पानंतर सरकारने आमदारांना मोठी भेट दिली. सर्व आमदारांना ब्रीफकेस आणि बजेटच्या प्रतीसह iPhone 13 (आयफोन 13) भेट देण्यात आला. गेल्या वर्षी आमदारांना ॲपल आयपॅड देण्यात आले होते. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडे निवडणुकीचे बजेट म्हणून पाहिले जात आहे. राजस्थानमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.
बुधवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजस्थानमधील सर्व 200 आमदारांना अशोक गेहलोत सरकारकडून iPhone 13 (आयफोन 13) भेट म्हणून देण्यात आला. गतवर्षी आमदारांना अर्थसंकल्पाच्या प्रतीसह Apple आयपॅड देण्यात आले होते.
राज्यातील काँग्रेस (Congress) सरकारने दिलेले आयफोन परत करण्याचा निर्णय भाजप आमदारांनी घेतला आहे. राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांनी ट्विट केले की, “विरोधी पक्षनेते गुलाब कटारिया आणि राजेंद्र राठोड आणि इतर आमदारांशी चर्चा केल्यानंतर, राज्यावरील आर्थिक बोजा लक्षात घेऊन राजस्थान भाजपच्या सर्व आमदारांना काँग्रेस सरकारने दिलेला iPhone परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेऊन राजस्थान भाजपचे सर्व आमदार काँग्रेस सरकारने दिलेले आयफोन परत करणार आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या. अर्थसंकल्पात विजेवर सबसिडी देण्याची घोषणा केली होती. दरमहा 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 50 युनिट वीज मोफत मिळणार आहे.
यासोबतच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली. गेहलोत म्हणाले की 1 जानेवारी 2004 आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करतो.
शहरी गरिबांसाठी मनरेगाच्या धर्तीवर नागरी रोजगार योजना जाहीर करण्यात आली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.